"रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा"
रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन तर्फे रविवार दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी सारसबाग,पुणे येथे सकाळी ८ ते १०.३० या वेळात, १ ली ते १० वी तसेच विशेष विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय "चित्रकला स्पर्धा" आयोजित करण्यात आली होती. डिजिटल युगातही मुलांमधील कल्पनाशक्तीला व कलागुणांना वाव मिळावा, प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ही चित्रकला स्पर्धा भरवण्यात आली होती. या चित्रकला स्पर्धेमध्ये विविध शाळातील ८०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पहिला गट - १ली व २ री, दुसरा गट – ३ री व ४ थी, तिसरा गट – ५ वी ते ७वी, चौथा गट – ८ वी ते १० वी आणि पाचवा गट - विशेष विद्यार्थी अशा पाच गटांमध्ये स्पर्धा विभागण्यात आली होती. रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊनच्या सर्व रोटेरियन्स, अँन्स व रोट्रॅक्टर्स यांनी स्पर्धेसाठी उत्तम नियोजन केले होते. मुलांची गटवार नोंदणी करून त्यांना चित्रकलेसाठी पेपर देण्यात आले. त्यानंतर बागेमध्ये विविध गटासाठी तयार केलेल्या विभागात हिरवळीवर बसून मुले त्यांना दिलेल्या गटवार विषयानुसार आपल्या आवडीची चित्रे काढण्यात व रंगवण्यात एकदम गुंग झाली. सकाळच्या गुलाबी थंडीत हे रंगीबेरंगी वातावरण अतिशय मोहक होते. मुलांची चित्रे पाहताना त्यांच्या अंगभूत कलेचा व अफाट कल्पनाशक्तीचा सुंदर अनुभव येत होता. स्पर्धेनंतर प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रशस्तीपत्रक व खाऊ देण्यात आला.
प्रत्येक गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके दिली गेली व सदर बक्षीस समारंभ दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७. ३० वाजता सेवासदन हायस्कूल हॉल, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल शेजारी, एरंडवणे, पुणे येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला अविस्मरणीय यश मिळवून देण्यात सर्व प्रायोजक, सहभागी शाळा, शिक्षक, पालक आणि आयोजक सर्वांचा मोलाचा वाटा आहे.
रो.अभिजीत म्हसकर
अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन