आयुष्य एक सुरेल गाणं, मनापासून गायचं
खर्जापासून टीपेपर्यंत सर्व सुरांमध्ये न्हायचं
प्रत्येकाच्या गाण्याला वेगवेगळा ताल
कुणी बिचारा अल्पायुषी, तर कुणाचा अनंत काळ
लय सापडायला कुणाला लागेल वेळ
पण एकदा लय सापडली की गाणं चांगलंच रंगेल
चुकून झालं जरी बेसूर, तरी पूर्ण गाणं गायचं
निराळा स्वर आळवून पुन्हा समेवर यायचं
आपल्या ओळी गाताना दुसऱ्याच्याही ऐकायच्या
त्याच्या आवडलेल्या लकेरी आपल्याही गाण्यात घ्यायच्या
कुणा एकाच्याच आलाप-ताना जर लागल्या आपल्याला मोहवायला
तर दोघांच्या भिन्न मुखड्यानंतर अंतरा एकच घ्यायचा गायला
पण पुढची कडवी गाताना आपलं ध्रुवपद नाही विसरायचं
मोकळ्या स्वरात आपणंच आपलं सुरेल गाणं गायचं
रो.डॉ.दीप्ती सिधये
रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स