रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स तर्फे २० आणि २१ ऑक्टोबर २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे "फिनिक्स कला संस्कृती महोत्सव" आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे ह्यांचे “नियम व अटी लागू”, प्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी आणि गझल गायक दत्तप्रसाद रानडे ह्यांचा “सोबतीचा करार”, तसेच सगळ्यांचे लाडके अभिनेते भरत जाधव ह्यांचे "पुन्हा सही रे सही" अश्या उत्तम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमातून उपलब्ध झालेला निधी हा ह्रदयस्पर्शी... साद एका श्वासाची ह्या आमच्या ट्रस्ट तर्फे सुरू करण्यात आलेल्या प्रोजेक्टसाठी वापरण्यात येणार आहे. ज्यामध्ये २५ लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात येतील.
ह्या कार्यक्रमाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स तर्फे ५ जणांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देण्यात आला. पहिले पुरस्कारविजेते आहेत प्रसिद्ध अभिनेते "श्री. विजय पटवर्धन" ज्यांनी कोव्हीड काळात बॅकस्टेज कलाकारांना आपल्या विजय पटवर्धन फाऊंडेशन तर्फे खूप मदत केली. दुसरे पुरस्कारविजेते आहेत श्री. श्रीपाद व सौ. शलाका घोडके ह्यांच्या Advika Welfare Foundation तर्फे, हे दोघे दहावी झालेल्या निराधार मुलांना रहाण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतात. तिसरे पुरस्कारविजेते आहेत श्री. सौरभ करडे, जे बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे शिष्य आहेत. ज्यांनी आतापर्यंत जग भरात २५०० पेक्षा अधिक शिव व्याख्याने दिली आहेत. व जे शिवचरित्राचा अखंड प्रसार करत आहेत. चौथे पुरस्कारविजेते आहेत, श्री. प्रशांत कांबळे, जे स्वतः एक कलावंत आहेत. पण कोव्हीड काळात ते स्वतःची रिक्षा चालवू लागले आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या रिक्षात कुसुमाग्रज फिरते वाचनालय त्यांनी सुरू केले.
ह्या महोत्सवादरम्यान आमच्या रोटरी क्लब ऑफ फिनिक्स परिवारात मध्ये ६ नवीन सभासदांची भर देखील पडली आणि आमचे फिनिक्स कुटुंब आणखी मोठे झाले. त्या सर्वांचे स्वागत! असा महोत्सव दरवर्षी करण्याचा आमचा मानस आहे.