जीवनाचे गीत माझे, एकटा मी गात आहे
प्रेम माझे काळकोठी, आज अंधारात आहे
भावनांचा पूर येता, मी कसा तो आवरावा?
रोज मी व्याकूळतेनी, होत अश्रू स्नात आहे
तू जवळ होतीस तेंव्हा, जीवनाला अर्थ होता
आज एकाकीपणा मज, एकट्याला खात आहे
हाय दैवा क्रूर चेष्टा, रेखिली माझ्याच भाळी?
पूर्वसंचित कर्मफळ हे, भोगणे नशिबात आहे
तू जगा ह्या सोडल्याने, ये विरक्ती या मनासी
मोक्षदायी साधनेच्या, नित्य मी शोधात आहे
तू जरी आता जगी या, देहरूपी वसत नाही
मी तुझ्या साऱ्या स्मृतींना, ठेवले ह्रदयात आहे
त्यागले तू जीवनाला, राहिलो मागे असा मी
'दास' तव विरहात वेडा, सोसतो आघात आहे
'दास' उर्फ अंबादास ठाकूर
रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स