स्त्री किती हळवी असते
छोट्या छोट्या गोष्टींना
हृदयाशी कवटाळून बसते
लुटूपुटूच्या संसारातील भातुकली
केस विस्कटलेली निळ्या डोळ्यांची बाहुली
डबीत जमवलेले मणी
रेशमी केसांच्या गंगावनाची
तिने प्रथमच घातलेली वेणी
कॉलेजच्या पहिल्या फी ची रिसीट
प्रियकराबरोबर पाहिलेल्या चित्रपटाचे तिकीट
लग्नात पुजलेला गौरीहर,
आईने दिलेला पोळपाट
पहिल्या नोकरीत मिळालेले बक्षीस
नव्या घरात हौसेने दिलेला रंग
भिंतीवरची नाजूक नक्षी
फांदीवरचा छोटासा पक्षी
भरभर सरलेली सुखाची वर्ष
मुलांच्या प्रगतीने झालेला हर्ष
पुलाखालून वाहून गेलेलं पाणी
समाधानी संसारातली ती अनभिषिक्त राणी
सामान कमी करायचा तिने घेतलेला ध्यास
काही वस्तू टाकताना मनाला झालेला त्रास
फांदीवरचा उडून गेलेला पक्षी
भिंतीवरची सुनी नक्षी
रंगाऱ्याने उचकटून काढल्यावर
मागे राहिलेल्या खुणा
डोळे मिटून सारं आठवते पुन्हा पुन्हा
स्त्री किती हळवी असते
छोट्या छोट्या गोष्टींना
हृदयाशी कवटाळून बसते
ॲन तन्वी थत्ते
रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज