रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास तर्फे १३७ कृत्रिम मॉड्युलर पायांचे वाटप
रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासने या वर्षीच्या त्यांच्या परिणामकारक व स्थायी बदल करणाऱ्या प्रकल्पामध्ये आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय देण्याचे ठरवलं. नुकत्याच सुवर्णस्मृती कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात रोटरी सहवासने १३७ अशा पायांचे वाटप केले. हा प्रकल्प रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास व भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासबरोबर या प्रकल्पात बॅरीकॅप प्रायव्हेट लिमिटेड आणि वन नेटवर्क एन्टरप्राइझेस या कंपन्यांचे CSR ( कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ) सहकार्य मिळाले. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या प्रकल्पासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास परिवारातील ४६ कुटुंबांनी ५७ कृत्रिम पाय प्रदान करण्यात स्वतःचा वैयक्तिक हातभार - ISR ( इंडिविझ्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) लावला.
हे आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय यापूर्वी बसवल्या जाणाऱ्या कृत्रिम अवयवांपॆक्षा वापरायला जास्त सोईचे आणि टिकाऊ आहेत. पूर्वी ज्यांना हे अवयव बसवले गेले होते अशा काही विकलांग व्यक्तींनी चालण्याचे - अगदी उड्या मारून दाखवण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल रो. शीतल शाह हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या कार्यक्रमासाठी बॅरीकॅप प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर श्री. राजेश पंतसचिव आणि वन नेटवर्क एन्टरप्राइझेसचे रो. समीर कुलकर्णी , उप प्रांतपाल रो. पुष्कराज मुळे , रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या प्रेसिडेंट रो. निवेदिता व प्रकल्प संयोजक रो. पुरुषोत्तम मुळे, मेडिकल प्रकल्प डायरेक्टर रो. महेंद्र व वर्षा चित्ते , रो. सुधीर वैद्य व इतर पदाधिकारी आणि रोटेरियन्स उपस्थित होते. भारतीय विकास परिषदेचे श्री. दत्ताजी चितळे व श्री. विनय खटावकर तसेच त्यांचे अनेक स्वयंसेवक उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
क्रिकेटवरचा आगळा वेगळा कार्यक्रम, पुण्यात प्रथमच, “क्रिकेटने मला काय शिकवले”
"नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्र मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे"..... सुनंदन लेले, क्रिकेट अँड बियॉंड चा हा परिचित आवाज गुरुवारी संध्याकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुमदुमला.
निमित्त होतं "क्रिकेटने मला काय शिकवले" सादरकर्ते सुनंदन लेले या रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास व सोळा इतर रोटरी क्लबस ने मिळून आयोजित कार्यक्रमाचं. अलीकडे दिवाळीची सुरुवात पहाट गाण्याने होते, या दिवाळीची सांगता सुनंदन लेले ह्यांच्या बरोबरच्या क्रिकेट मैफिलीने अविस्मरणीय झाली.
सुनंदन लेले जेव्हा क्रिकेटवर भाष्य करतात तेव्हा ते अल्टिमेट असतं, कारण त्या पाठीमागे असतो त्यांचा काही दशकांचा क्रिकेट पत्रकारितेचा अनुभव, तसेच ते स्वतः अत्यंत अत्युच्च दर्जाचं क्रिकेट खेळले आहेत. महाराष्ट्र संघाकडून रणजी सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा ते खेळले आहेत. राष्ट्रीय स्तरावर खेळलेला माजी क्रिकेटपटू जेव्हा क्रिकेटवर बोलतो तेव्हा त्याने सांगितलेले किस्से, त्याचे अनुभवाचे बोल "डोन्ट मिस" या सदरातलेच असतात.ज्यांच्यासाठी क्रिकेट हे पॅशन असतं अशांनी केवळ श्रवणभक्ती करायची असते. जी आम्ही केली, आणि एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवली.
लेले सरांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की हा केवळ क्रिकेट या विषयावर आधारित कार्यक्रम नाही तर क्रिकेटने मला काय शिकवले हे सांगणारा कार्यक्रम आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात की जेव्हा धैर्य, संघभावना, पेशन्स, परस्परांवरील विश्वास, परिणामकारक नेतृत्व, आपल्या कामावरील निष्ठा अशा गोष्टींचा कस लागतो. प्रत्येक डावाची सुरुवात ही नव्यानेच करावी लागते, नुसतं जीनियस असून भागत नाही तर त्याला कठोर परिश्रमाची जोड असावी लागते, नियम बद्ध, शिस्तशीर जीवनशैलीची आवश्यकता असते, यशाने हुरळून जाण्यात अर्थ नाही, तसेच अपयशाने खचूनही चालणार नाही असे अनेक क्रिकेट मधील मान्यवरांचे किस्से सुनंदन लेले यांनी आपल्या कार्यक्रमात सांगितले.कार्यक्रम हा अक्षरशः हाऊसफुल होता . ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. समीर कुलकर्णी यांनी केले, क्लबच्या अध्यक्षा
रो. निवेदिता मुळे यांनी सगळ्यांचे स्वागत केले. रोटरीचे प्रांतपाल रो. शीतल शहा व अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
रो.निवेदिता मुळे
अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास