District Governor - Rtn. Manjoo Phadke
May-2024
Editor - Rtn. Madhur Dolare

रोटरी इन्टरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे ‘ग्रीन एक्स्पो २०२४' Back
पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यान येथे २७ आणि २८ एप्रिल २०२४ रोजी रोटरी इन्टरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे ‘ग्रीन एक्स्पो २०२४ ’ आयोजित करण्यात आले होते. एक्सपोचे उद्घाटन २७ तारखेला Green TERRE चे संस्थापक संचालक डॉक्टर राजेंद्र शेंडे ह्यांच्या हस्ते झाले. उद्‌घाटनप्रसंगी बोलतांना डॉक्टर राजेंद्र शेंडे म्हणाले, निसर्गातील हस्तक्षेपामुळे अनेक पर्यावरणीय समस्या उद्भवल्या असून त्या समस्यांचा सामना करण्यासाठी आपणास पर्यावरण पूरक उपाय शोधावे लागणार आहेत. समाजातील सर्वच स्तरांमध्ये आणि विषेशत: तरुणांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीवा जागृत कराव्या लागणार आहेत. डिजिटल साधने आणि ड्रोन सारख्या उपकरणांचा उपयोग करून आपण कार्बन फूटप्रिंटचा आलेख कसा कमी होत आहे याचे निरीक्षण केले पाहिजे. पर्यावरणीय समस्यांमधून सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या संधी उपलब्ध होत असल्या तरी या पर्यावरणीय उपायांचे जीवनमान संपल्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे काय करायचे या प्रश्नाकडेही गांभीर्याने पाहिले पाहिजे.

२७ तारखेच्या दुपारच्या सत्रामध्ये OIKOS कंपनीतर्फे तज्ञ केतकी साठे कुलकर्णी ह्यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यावर मार्गदर्शन केले. घराच्या गच्‍चीवर, गॅलरीमध्ये, सोसायटीमध्ये किंवा फार्म हाऊस मध्ये वृक्षारोपण करताना जमीनीची प्रत, पाण्याची उपलब्धता ह्या घटकांचा विचार करायला पाहिजे. त्याचप्रमाणे झाडे शोभेसाठी, सावलीसाठी की फळाफुलांसाठी हवीत हे जाणून लागवड करणं आणि झाडांचं संवर्धन करणं हे पण महत्त्वाचं आहे.

संध्याकाळच्या सत्रात ‘समुचीत एनविरो टेक’ च्या कार्यकारी संचालक डॉक्टर प्रियदर्शनी कर्वे यांनी वेस्ट मॅनेजमेंट ह्या विषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक सोसायटीमध्ये कचरा वेगवेगळा करावा, ओला कचरा तिथेच जिरवावा अशा पारंपारिक गोष्‍टींव्यतिरिक्त त्यांनी एक वेगळाच जागतिक दृष्‍टिकोन मांडला. पॅकिंग साठी वापरले जाणारे वन टाइम प्लॅस्टिक ही फार मोठी समस्या आहे. त्याला पर्याय शोधण्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. धान्य किंवा भाजीपाला घेतल्यानंतर उरणारा काडीकचऱ्यावर स्थानिक किंवा गावपातळीवर प्रक्रीया केल्यास उत्तम प्रतीचा कांडी कोळसा उपलब्ध होऊ शकतो. जो तिथल्या शेतकर्‍यांना वापरता येईल, शिवाय काही मुलांना रोजगारही उपलब्ध होईल. अशा अनेक कल्पना त्यांनी मांडल्या ज्यायोगे प्रदुषण कमी होऊ शकेल.

ग्रीन एक्सपोच्या निमित्ताने शाळेच्या मुलांना पर्यावरण पूरक मॉडेल बनवण्याची आणि कॉलेजच्या मुलांसाठी शॉर्ट फिल्म करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ह्या स्पर्धेला खूप छान प्रतिसाद मिळाला. ग्रीन फार्मिंग, सोलर सिस्टिम्स, गार्बेज डिस्पोजल अशा अनेक विषयांवर मॉडेल्स आणि शॉर्ट फिल्म्स बनवण्यात आल्या होत्या. २८ तारखेला सकाळच्या सत्रात प्रमुख पाहुणे श्रॉफ फाऊंडेशनचे श्री. जे. पी. श्रॉफ आणि PDG डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते विजेत्या टीमसना
पारितोषिके प्रदान करण्यात आली.

दुपारच्या सत्रामध्ये Natural Resource Management Services चे संचालक, डॉ. उमेश मुंडले यांनी जलसंवर्धनासाठी पाण्याचे साठे कसे तयार करावेत, घराघरामधून पाणी कसे वाचवावे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बागेला पाणी कसे द्यावे, पाण्याचा पुनर्वापर कसा करावा ह्याविषयी मार्गदर्शन केले.

या नंतरच्या सत्रामध्ये सोलर पॉवर संदर्भात ESARG चे संचालक रो. जयदीप मालवीय यांनी मार्गदर्शन केले. घरगुती वापरासाठी दिवे किंवा वॉटर पंप यासाठी सोलर पॅनल्स वापरली जातात. त्याबरोबर व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापनांसाठीही सोलर पॉवर वापरल्यास उर्जाबचत होऊ शकते.

रोटरी ग्रीन सोसायटी प्रकल्पामध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरी केलेल्या गृह निर्माण संस्थाना केपीआयटीचे अध्यक्ष मा. श्री. रवी पंडित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अनेक सोसायट्यांमध्ये पर्यावरण पूरक बदल करण्यात आले याबद्दल समाधान व्यक्‍त करताना श्री. रवी पंडित म्हणाले की रोटरीने हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

या कार्यक्रमासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या प्रांतपाल मंजू फडके याही आवर्जून उपस्थित होत्या. हा उपक्रम त्यांच्या अपेक्षेपेक्षाही उत्तम रितीने सफल केल्याबद्दल त्यांनी प्रकल्प संचालक रो. केशव ताम्हणकर, प्रकल्प सहसंचालक रो. संतोष जोशी, रोटरी ग्रीन सोसायटीची डिस्ट्रिक्ट टीम व सर्व सह्भागी रोटरी क्लब्जचे अभिनंदन केले.

ग्रीन एक्सपो मध्ये पर्यावरण पूरक उत्पादने व सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे ४४ स्टॉल्स होते. त्यामध्ये सोलार, कंपोस्टिंग, रेन वॉटर हारवेस्टींग, गार्डनिंग, सेंद्रिय उत्पादने ह्यांचा समावेश होता. सामान्य नागरिकांचाही या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. २००० पेक्षा जास्त लोकांनी एक्सपोला भेट दिली. रोटरीचे ‘ग्रीन एक्स्पो’ संपन्‍न झाले असले तरी ‘पर्यावरण संवर्धन’ हा उपक्रम रोटरीतर्फे अविरत चालूच असणार आहे!