पाडव्याच्या पहाटे धुक्याच्या दुलईत लपेटलेल्या रस्त्याने
पक्ष्यांचा चिवचिवाट, शीतल वारा तनामनाला सुखवत
चालता चालता पायाखाली काही चुरमुरलं
काय आहे बघणारच खाली, तेव्हढ्यात
दूरवर एक दिव्य स्त्री पाठमोरी धुक्यात विरताना दिसली
पळालेच तिच्यामागे मग मी जीवाच्या आकांताने
विरता विरता थबकली ती, वळली नवलाने बघत माझ्याकडे
अगंबाई ही तर देवी लक्ष्मी, कालच नाही का पुजली आम्ही
हात जोडून, मान लववून विचारलं न राहवून
देवी लक्ष्मीमाते भक्तांना सोडून इतक्या सकाळी निघालात
काही चुकलं का आमचं?
निघालेय सृष्टीकर्त्या ब्रम्हाकडे, देवी वदली
चेहरा अपार कष्टी, गोंधळलेला
ब्रम्हाकडे? का? मी बुचकळ्यात
प्रश्न विचारायचाय एक त्या जगनियंत्याला
दहा दिवस राहून गणपती परत येतो
गुलालाच्या साथीने पाण्याच्या लाटेवर स्वार होऊन
नऊ दिवस राहून दुर्गा परतते
सिंदूर लेपून लाटांवर विराजून
मी रहायला येते परत न जाण्यासाठी
माझं स्वागत होतं जुगाराच्या खेळाने
आणि माझाच धूर करून
काही चुकतंय का माझं कायमचं येण्यात?
मी पण काही काळासाठीच यायला हवं का?
हा धूर कधी आला माझ्या साथीला?
नेहमीच होता की मधेच दबकत आला?
खूप प्रश्न आहेत मनात भिरभिरत
शोधते जरा मगच येईन म्हणते
देवी अंतर्धान पावली
पायाखाली बरंच काही चुरमुरलं
मी मुकाट्याने रोजची वाट पकडली
रो.वृंदा वाळिंबे
डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी पब्लिकेशन २०२४ - २५