रोटरी क्लब ऑफ लोकमान्यनगरचा सिग्नेचर प्रोजेक्ट - अंधजन विकास ट्रस्टच्या सभासदांबरोबर देवदर्शन
Back
रोटरी क्लब ऑफ लोकमान्यनगरच्या वतीने अंध बांधवांसाठी एक सिग्नेचर प्रोजेक्ट दरवर्षी केला जातो. या वर्षीही अंधजन विकास ट्रस्टच्या ४५ अंध सभासदांना श्री महालक्ष्मी कोल्हापूर, नरसोबाची वाडी आणि बाळूमामा या देवस्थानांची दर्शन सहल १८ व १९ एप्रिल २०२४ रोजी गेली होती. यामध्ये रोटरी क्लब च्या वतीने अध्यक्ष मनोज अगरवाल, सेक्रेटरी ऋषिकेश बागडे आणि प्रकल्प प्रमुख महेश घोरपडे आणि अंधजन विकास ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. भोर उपस्थित होते.
सदरील प्रकल्पासाठी सर्वाधिक खर्च हा वाहन व्यवस्थेवर होणार होता. हा खर्च यु.एस.ए. स्थित राहुल दातीर यांनी उचलला आणि भोजन, नाश्ता व राहण्याची सोय त्या त्या देवस्थानांनी केली. सर्व अंध सभासद खुश होते.
या सहलीच्या वेळी एक प्रसंग घडला ज्यामुळे कित्येक वर्षे अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडले. झाले असे कि, या अंध बांधवांना देवदर्शनासाठी किंवा किल्ल्यांच्या भेटीसाठी घेऊन जाताना आम्हाला बऱ्याच वेळा 'यांना दिसत नाही, तर यांना इथे घेऊन येऊन काय साध्य करता?' हा प्रश्न गेली कित्येक वर्षे आम्हाला विचारला जातो. ह्यावेळी श्री महालक्ष्मी मंदिरात आमच्या ग्रुपमधील ६० वर्षीय अंध महिलेला मंदिराच्या सुरक्षारक्षकाने नेमका हाच प्रश्न विचारला, "आजी, तू मंदिरात
येऊन काय बघितलेस? देव दिसला का?"; त्यावर तिने दिलेले उत्तर आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन गेले. ती म्हणाली, "बाबा, अरे मला नाही दिसला देव, त्याने काय फरक पडतो? पण देवाला डोळे आहेत ना! त्याने तर मला बघितले ना! झालं तर मग!"
अशी ही सहल पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिर, नवा राजवाडा संग्रहालय, बाळूमामा देवस्थान या ठिकाणी भेट देऊन झाली. रात्रीचा मुक्काम कण्हेरी मठात केला. दुसऱ्या दिवशी कण्हेरी मठाला भेट देऊन नरसोबाची वाडी येथे दत्ताचे दर्शन घेऊन नौकाविहाराचाही आनंद सर्वानी लुटला आणि परतीच्या प्रवासाला निघाले. संपूर्ण सहली बरोबर नियोजनासाठी अंधजन विकास ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. भोर, रोटरी क्लब चे प्रकल्प प्रमुख महेश घोरपडे हे उपस्थित होते.